मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुढील ७२ तासांत मध्य व पूर्व भारतावर नैर्ऋत्य मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. शिवाय पुढील ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही दिला आहे. तत्पूर्वी अरबी समुद्रातील वातावरणीय बदलांमुळे पावसाच्या ढगांनी मुंबापुरीकडे पाठ फिरवल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये सर्वत्र चांगला पाऊस झाला. परंतु जुलै आणि आॅगस्टमध्ये पावसाने हात आखडता घेतला. मागील आठवड्यात पावसाने पूर्णत: विश्रांती घेतली. त्यामुळे तुटीचा आकडा ९वरून १० टक्क्यांवर गेला. परंतु आता कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य आणि पूर्व भारतावर पाऊस सक्रिय होणार आहे. परिणामी, ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, ओरिसाचा किनारी भाग, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हा पाऊस होईल. कमी दाबाच्या क्षेत्रीय प्रभावामुळे देशाच्या दक्षिणेकडेही पाऊस होण्याची चिन्हे असून, तो मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा असेल.दरम्यान, पावसाने मुंबईकडे फिरवलेली पाठ कायम असून, गेल्या २४ तासांत सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेत पावसाची नोंदच झालेली नाही. शिवाय शहराचे कमाल तापमान ३१ अंशावर पोहोचले असून, मुंबईकर घामाघूम होत आहेत. (प्रतिनिधी)
मध्य, पूर्व भारतात पाऊस पुन्हा सक्रिय होणार
By admin | Published: August 25, 2015 2:56 AM