पिंपरी : पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांचा विषय स्थायी समिती सभेत गाजला. ‘पहिल्या पावसात पडलेले खड्डे बुजविल्यानंतर दुसऱ्या पावसात त्याच ठिकाणी खड्डे पडतातच कसे?’ असा सवाल सदस्यांनी व्यक्त केला. ‘रस्त्यांच्या कामांची तपासणी करण्याची गरज आहे’, अशी मागणीही सदस्यांनी केली. याबाबत कडक धोरण राबवावे, अशी अपेक्षाही व्यक्त झाली.पहिल्याच पावसात पडलेल्या खड्ड्यांविषयी सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ज्या रस्त्यावरील खड्डे बुजविले, तिथेचे खड्डे पडले आहेत, अशा तक्रारी सदस्यांनी आजच्या सभेत केल्या. ‘रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी एसजीएस संस्था असतानाही खड्डे पडतात कसे, याबाबत प्रश्नही उपस्थित करण्यात आला. नारायण बहिरवाडे म्हणाले, ‘‘प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम केल्यानंतर त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. एवढा मोठा पाऊस पडलेला नसतानाही खड्डे पडतातच कसे? एखादा रस्ता तयार केल्यानंतर तीन वर्षे त्या रस्त्याचे काम करण्याची गरज भासू नये. ठेकेदारांकडून वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासणी गरजेचे आहे. तशा अधिकाऱ्यांना सूचना देण्याची गरज आहे.’’ धनंजय आल्हाट म्हणाले, ‘‘जोरदार पाऊस नसतानाही रस्त्यावर खड्डे कसे काय पडले? निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यानेच बुजविलेल्या जागेवर खड्डे पडले आहेत.’’ त्यानंतर अध्यक्ष डब्बू आसवानी यांनी पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशा सूचना केल्या. (प्रतिनिधी)
खड्ड्यांच्या मुद्द्यावर तक्रारींचा ‘पाऊस’
By admin | Published: September 21, 2016 2:12 AM