लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकर शनिवारी साखरझोपेत असतानाच पुन्हा एकदा आकाशात अतिवृष्टीचे ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. सोबत जोरदार वाऱ्यानेही हजेरी लावली आणि काही क्षणातच पावसाने मुंबईला झाेडपून काढले. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गातही सायंकाळनंतर पावसाने जोर लावला आहे. विदर्भातही सर्वदूर दमदार सरी कोसळल्या.
मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत पहाटे सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सकाळी ९ ते १० च्यादरम्यान दादरपासून कुर्ला, सायन आणि घाटकोपर याठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली. या काळात मुंबईवर ढगांचा गडगडाट सुरूच होता. पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईला कवेत घेतले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कुर्ला आणि आसपासच्या परिसरात मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर जणूकाही ओढे वाहू लागले आहेत, असे चित्र होते. पावसामुळे वाहतुकीला ब्रेक लागला होता. दुपारी तसेच संध्याकाळी मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली. रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी सकाळपासून विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळनंतर संततधार सुरू आहे. हवामान खात्याने दि. १२ व
१३ जूनरोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धोकादायक ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबई, ठाण्याला ऑरेंज, तर रायगडला रेड अलर्टमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सकाळी पावसाने धिंगाणा घातला होता. मात्र दुपारनंतर येथील जोर ओसरला. हवामानातील बदलानुसार, आता रविवारी मुंबई, ठाणे, पालघर व सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, रायगड व रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे. कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.