पुणे : राज्यात अजून मान्सून दाखल झालेला नाही. तो आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण वगळता राज्यात इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये. पुरेसा पाऊस पडून जमिनीत ओलावा निर्माण होईपर्यंत पेरणी करणे टाळावे, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाचे आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना केले. पाऊस नसताना पेरण्या केल्यास पिकाच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली. कृषी विभागाच्या राज्यस्तरीय हवामान आधारित कृषी विषयक सल्ला समितीची बैठक मंगळवारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यास भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मान्सूनची सद्यस्थिती, राज्यात येण्यास होणारा उशीर, सध्याची पावसाची स्थिती यांवर चर्चा झाली. देशमुख म्हणाले, सध्या राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. पावसाच्या ओलाव्याच्या आधारे धूळपेरणी करण्यात येत आहे. मात्र कोकण वगळता राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. अपुऱ्या पावसामुळे जमिनीचा ओलावा वाढणार नाही. त्यामुळे खरिपाची पेरणी केल्यास उगवणीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सून दाखल झाल्याशिवाय आणि चांगला पाऊस पडून जमीन ओली झाल्याशिवाय पेरण्या करू नये. (प्रतिनिधी)पाच दिवसांत होणार दाखलउंबरठ्यावर थबकलेल्या मान्सूनला राज्यात दाखल होण्याची अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत तो कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. १७ व १८ जूननंतर राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
पाऊस लांबला, पेरण्या थांबवा!
By admin | Published: June 15, 2016 3:20 AM