मुंबई:महाराष्ट्रातील विविध भागात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जूनपासून आतापर्यंत पावसाने 76 जणांचा बळी घेतलाय. याशिवाय पावसामुळे 838 घरांचे नुकसान झाले आहे. यादरम्यान 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. याशिवाय, आतापर्यंत 125 जनावरेही दगावल्याची माहिती आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानेच ही माहिती दिली आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पावसामुळे पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोलीतील 128 गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार, गडचिरोलीशिवाय मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवारी 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन गावे आणि आसना नदीच्या काठावर वसलेल्या शेजारील नांदेड जिल्ह्यातील हदगाव गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबई राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.