होळीच्या दिवशी मध्यरात्रीपासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पाऊस पडला आहे. सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण असून पुढील ३-४ तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पाश्चिमात्य वाऱ्यांमुळे अरबी समुद्रावर दाब निर्माण झाला आहे. यामुळे हा अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबई ठाणे, पालघर, नाशिक अहमदनगर, छ. संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भातील काही भाग, तसेच मराठवाड्यावरही मध्यम ते तीव्र स्वरुपाचे ढग दाटले आहेत. 3, 4 तासांत या भागांमध्ये मध्यम ते तीव्र वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगाली-पिंपळा, कवडगांव, सुशी, वडगाव, चिखली, कोळगाव, पाडळसिंगी, मादळमोही, धोंडराई, उमापूर, कुंभेजळगाव, तलवाडा सह तालुक्यातील अनेक गावातील परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होवून काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे रब्बी हंगामातील टरबूज, खरबूज, गहु, हरभरा, मका, ज्वारीसह पालेभाज्या तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले.