मुंबई- गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस मुंबईसह राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबई शहरापेक्षा उपनगरांत आणि ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहेत. पावसाच्या दमदार सरींमुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या २४ तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात पावसाचा जोर असून, अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे. पश्चिम उपनगरांत दहिसर, बोरिवली, गोरेगाव, मालाड भागातही पावसाचा जोर चांगलाच होता. वडाळा ते कांजूरमार्ग परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
RAIN LIVE UPDATES