सागर सिरसाट -मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण गुरुवारी अनेक अनपेक्षित घडामोडींनी ढवळून निघालं. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे पुढील मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा केली आणि महाराष्ट्रासह सोशल मीडियावरही एकच खळबळ उडाली. संपूर्ण सोशल मीडियात महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा सुरू झाली. ट्वीटरवर तर अनेक तास सर्वत्र हाच विषय ट्रेंडिंगमध्ये आला. पहिल्या २० पैकी किमान १५ ट्रेंड्स फक्त महाराष्ट्रातील राजकारणाविषयीच होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, महाराष्ट्र, मास्टरस्ट्रोक, शिवसेना, उद्धव ठाकरे, ठाकरे सरकार, मुख्यमंत्री शिवसेना, न्यू सीएम, चाणक्य असे विविध हॅशटॅग लगेचच चर्चेत आले.
एका दगडात दोन पक्षी -अचानक शिंदेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून समोर येताच नेटकऱ्यांनी हा भाजपचा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले. अनेकांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना या मास्टरस्ट्रोकचे श्रेय दिले. एका दगडात दोन पक्षी मारल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.
सत्ता में आता हूं, समझ में नही -सत्ता मैं आता हूं समझ मैं नही, या ओळींसह अमित शहांचा एक फोटो दिवसभर सोशल मीडियात नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. मोदीजींनी थांबवलंय नाहीतर पाकिस्तानमध्येही सरकार स्थापन करेन, अशा मिश्कील कॅप्शनसह अमित शहांचा अजून एक फोटो चांगलाच व्हायरल झाला.
विठ्ठलाच्या मनात वेगळेच होते... -आषाढीच्या पूजेचा सन्मान कोणाला मिळणार, याबाबत गेले काही दिवस चर्चा होती. मात्र, विठ्ठलाने पूजेचा मान एकनाथांना दिला. विठ्ठलाच्या मनात काही वेगळेच आहे, हा मेसेजही इंटरनेटवर लक्षवेधी ठरला.अमित शहा चाणक्य -शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणक्य म्हटले जातात; पण अचानक घडलेल्या घडामोडींनंतर खरे चाणक्य अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस असल्याचे अनेकांनी म्हटले.
फडणवीस तुम्ही तर देवमाणूस -स्वतःऐवजी शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केल्यानंतर नेटकऱ्यांनी फडणवीसांबाबत मजेशीर ट्वीट केले. तुम्ही तर देवमाणूस निघालात, अशा कॅप्शनसह परेश रावल यांचे मिम्स व्हायरल झाले.