मुंबई : मान्सूनची वाटचाल शुक्रवारी दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात, तामिळनाडू, बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भाग, संपूर्ण आंध्र प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, ओडिसाचा काही भाग तसेच झारखंड, बिहारच्या काही भागांत झाली. सध्या तो दक्षिण महाराष्ट्रात खोळंबला असून, ४८ तासांत राज्यभर पसरण्याची शक्यता आहे.‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास पुन्हा सक्रिय झाला असला तरी प्रत्यक्षात पाऊस मात्र बेपत्ताच आहे.दरवर्षी आतापर्यंत मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात होते. परंतु मुंबईत अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने मुंबईकरांना उकाड्यालाच सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. महत्त्वाचे म्हणजे मान्सून राज्यात दाखल झाला असतानाही विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती.कोकणात पावसाची शक्यता२२ ते २५ जून या कालावधीत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ ते २३ जूनदरम्यान मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.प्रवास रेंगाळला : मान्सून तेलंगणा, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत तो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दाखल होईल. नवी दिल्लीत मात्र मान्सून जुलै महिन्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात गुरुवारी दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास शुक्रवारी मात्र रेंगाळला. पुढील ४८ तासांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दक्षिण महाराष्ट्रात पाऊस खोळंबला; विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 5:13 AM