औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे सुधाकर आनंदा मोरे (३०) या शेतमजुराचा वीज पडून मृत्यू झाला. आडगाव मुटकुळे शिवारात दोन म्हशी दगावल्या. जाफराबाद आणि परतूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. वाशी तालुक्यात पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. कन्नड तालुक्यात गारा पडल्या.औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, खुलताबाद, वैजापूर, सिल्लोड तालुक्यात तुरळक पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील शिराळा परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. उस्मानाबादमध्ये वाशी तालुक्याला अवकाळीने झोडपले. बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई पाठोपाठ रविवारी बीड, गेवराई तालुक्यांमध्येही पाऊस झाला. (प्रतिनिधी)जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे कांदा, डाळींब व कापूस पिकाला फटका बसला. नाशिकला गारांचा वर्षाव गारांच्या वर्षावासह झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी नाशिकला चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर शहरातील काही भागाचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. ३३ आणि ११ केव्ही वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
राज्यात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2016 4:00 AM