मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाचा फटका राज्यातील काही जिल्ह्यांना बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजून पुढचे काही दिवस महाराष्ट्राला पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. कारण, राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने अंदाज वर्तविला आहे. "रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. तसेच, अशीच पावसाची परिस्थिती ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे," असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आला आहे.
दरम्यान, मराठवाड्यासह राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तेथील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.