मुंबई : मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील बहुतांश ठिकाणी मान्सून पसरला असला तरी हा पाऊस सरासरीपेक्षा कमीच असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. शुक्रवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता आहे.
गेल्या सात दिवसांत मुंबई उपनगर, पालघर, लातूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. मुंबई शहर, ठाणे, रायगड, सोलापूर, अहमदनगर आणि नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या २० ते ५९ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, बीड, परभणी, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सरासरी पाऊस झाला आहे. तर उर्वरित जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला २४ तासांत ११८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोवीस तासांत वेंगुर्ला तालुक्यात ८०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नंदुरबारमध्ये दमदारनंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. नवापूर तालुक्यात २४ तासांत ८७.८ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामुळे रंगावली नदी दुथडी भरून वाहिली.