मुंबई : घामाच्या धारांनी मुंबईकरांचा जीव काढला असतानाच पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या मान्सूनने किंचित का होईना दिलासा दिला आहे. मात्र पावसात सातत्य नसल्याने घामाच्या धारांचा वर्षाव सुरूच असतानाच आता राज्यात देखील पुढील तीन ते चार दिवस अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मुंबईत पाऊस सक्रिय गेल्या तीन दिवसांपासून पाऊस मुंबईत सक्रिय आहे. शनिवारी रात्रीसह रविवारी दुपारी पावसाचा जोर कायम होता. रविवारी रात्री मध्य मुंबईत पावसाने हलकी हजेरी लावली. सोमवारी मात्र पाऊस दिवसभर गायब होता. दिवसभर उन्हाने मुंबईत ठाण मांडले होते. परिणामी मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त झाले होते.
राज्यातील पुढील तीन ते चार दिवस अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाचव्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग