मुंबई : पश्चिम बंगालसह केरळपासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांसाठी पश्चिम किनारपट्टीला चांगला पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.सद्य:स्थितीत कोकण आणि गोव्याच्या उपभागात ३३ टक्के पावसाची कमतरता आहे. तसेच केरळ आणि कर्नाटकची किनारपट्टी येथे अनुक्रमे २९, २७ टक्के पावसाची कमतरता आहे. यंदाच्या मान्सून काळात कर्नाटकच्या किनारपट्टीला २ हजार मिमी, कोकण आणि गोवा येथे १ हजार ८०० मिमी आणि केरळ येथे १ हजार ४०० मिमी पाऊस पडला आहे. तरीही पावसाचे प्रमाण कमीच मानले जाते. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, पश्चिम किनारपट्टीला असलेले गोवा, कर्नाटकाची किनारपट्टी आणि केरळ या तिन्ही भागात जास्त पाऊस होतो. परंतू यंदाचा नैऋत्य मान्सून मात्र या भागांसाठी फारसा उत्तम ठरला नाही. आता बंगालच्या उपसागरात आणि ओरिसा किनारपट्टी, आंध्रप्रदेश आणि लगतच्या छत्तीसगड या भागांवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाचा पट्टा प्रभावी होण्यास मदत होत असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सुरूच राहणार
By admin | Published: September 17, 2015 2:08 AM