लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे/मुंबई : विश्रांती घेतलेला पाऊस ऑगस्टच्या अखेरीस बसरण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात १८ ते २४ आणि २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात आणि शेजारील तसेच शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे; पण स्पष्टता नाही, असे हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसळीकर म्हणाले.
या जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात मान्सून सक्रिय होईल. सप्टेंबर महिन्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ६ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.