हरभजनही सामना जिंकून देतो रे! : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 05:49 AM2018-02-17T05:49:13+5:302018-02-17T05:49:20+5:30
‘आज माझी खूप अवघडल्यासारखी परिस्थिती झाली आहे़ क्रिकेटच्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनंतर हरभजनसिंग बॅटिंगला आला आहे. आता त्याची बॅटिंग कोण पाहणार तसे माझे झाले आहे’, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हणताच ‘अरे धनंजय, कधी कधी हरभजनसिंगही सामना जिंकून देतो रे.
राहुरी(जि. अहमदनगर) : ‘आज माझी खूप अवघडल्यासारखी परिस्थिती झाली आहे़ क्रिकेटच्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनंतर हरभजनसिंग बॅटिंगला आला आहे. आता त्याची बॅटिंग कोण पाहणार तसे माझे झाले आहे’, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हणताच ‘अरे धनंजय, कधी कधी हरभजनसिंगही सामना जिंकून देतो रे. त्यामुळे तू बिनधास्त बॅटिंग कर’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना धीर दिला.
झाले असे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेस गुरुवारी श्रीगोंदा येथून प्रारंभ झाला़ त्यानंतर शेवगाव येथील सभा झाल्यानंतर राहुरी येथील शेवटच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते पोहोचले होते. सायंकाळी असलेल्या सभेला विलंब होऊ लागल्याने विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट व्यासपीठावरच आले आणि भाषणाला सुरुवात केली. मोटारसायकल रॅली संपवून धनंजय मुंडे सभास्थळी आली तेव्हा पवार यांचे भाषण सुरु होते.
हरभजनची बॅटिंग कोण पाहणार : भाषणाला उभे राहिलेले मुंडे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते यांनी भाषण केल्यानंतर मी बोलणे पक्षशिस्तीत बसत नाही. विराट कोहलीची बॅटिंग झाल्यानंतर हरभजन सिंगची बॅटिंग कोण पाहणार? असा मिष्किल सवाल मुंडे यांनी केला. त्यावर ‘कधी कधी हरभजन सिंग सुद्धा सामना जिंकून देतो, तू बिनधास्त भाषण कर’, असा सल्ला अजित पवारांनी दिला आणि मग आपल्या नेहमीच्या शैलीत सरकारविरुद्ध जोरदार बॅटिंग करीत मुंडेंनी सभा जिंकली.