पुणे : जून महिना धो धो पावसाचा... मे महिन्याच्या शेवटापासून सुरू होत असलेला पाऊस जून महिन्यात मुसळधार पडतो आणि धरणांमधील पाणी वाढू लागते. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरी मुसळधार पाऊस पडलेला नाही. पुणे जिल्ह्यातील २५ धरणांपैकी ३ धरणे वगळता सर्व धरणांमध्ये १ जूनपासून २७ जूनपर्यंत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये पाण्याच्या एका थेंबाचा येवा झालेला नाही.दरवर्षी साधारणत: ७ जूनला मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होतो आणि मुसळधार पावसास सुरुवात होते. पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असते. त्यामुळे जून महिन्यातच धरणांमध्ये पावसाचे पाणी जमा होण्यास सुरुवात होते. गतवर्षी पुण्यासह राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे दुष्काळही पडला; मात्र जून महिन्यात उशिरा सुरू झालेल्या पावसाने धरणांमध्ये पाणीसाठा जमा होण्यास सुरुवात झाली होती. यंदा राज्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. त्यामुळे दुष्काळाने होरपळत असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये जून महिन्यात पाणीसाठा होईल आणि सगळीकडे सुरू असलेली पाणीकपात बंद होईल, अशी आशा नागरिकांना होती; मात्र प्रत्यक्षात जून महिन्यात पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. त्यातही जिल्ह्यात असलेल्या २५ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडलेला आहे. दरवर्षी साधारणत: जून महिन्यात या धरणक्षेत्रांमध्ये २०० ते २५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडेलला असतो; मात्र यंदा जून महिना संपत आला, तरी २२ धरणांमधील पडणाऱ्या पावसाला १०० मिमीचा आकडाही गाठता आलेला नाही. १ जूनपासून आतापर्यंत उजनी धरणामध्ये सर्वाधिक १६६ मिमी पाऊस पडला आहे. त्यापाठोपाठ मुळशी धरणात १५० मिमी आणि टेमघर धरणामध्ये १०३ मिमी पाऊस पडला आहे. सर्वांत कमी १७ मिमी पाऊस हा डिंभे धरणात पडला आहे. त्याचपाठोपाठ माणिकडोह, वडज, भामा आसखेड धरणात ३४ मिमी, कळमोडी धरणात ३९, चासकमान धरणात २९ मिमी, कासारसाई धरणात ३५ मिमी, खडकवासला धरणात ३१ मिमी, नाझरे धरणात ३७ मिमी पाऊस पडला आहे.पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने धरणांमध्ये पावसाच्या पाण्याचा एक थेंबही येवा झालेला नाही. अगोदरच धरणांनी तळ गाठलेला असताना पाऊस पडत नाही आणि त्यामुळे पाणी येत नसल्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे.>पुणेकरांनी घाबरून जाऊ नये पुणे : शहरातील धरणांनी तळ गाठला असल्याने पाणीकपातीमध्ये वाढ करण्याचा विचार प्रशासन करीत आहे, मात्र या वर्षीप्रमाणेच २००९, २०१० व २०१२ या ३ वर्षी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर चांगला पाऊस झाल्याने त्यात सुधारणा झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १.५४ टीएमसी इतका कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच दिवशी ७ टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याची स्थिती गंभीर झाली आहे. मात्र याहीपेक्षा गंभीर परिस्थिती यापूर्वी ३ वर्षे निर्माण झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.२००९ मध्ये आज ०.७२ इतका नीचांकी साठा शिल्लक राहिला होता, नंतर जुलै, आॅगस्टमध्ये पाऊस झाल्याने परिस्थिती सुधारली आहे. त्यानंतर २०१० मध्येही याच दिवशी १.१७ टीएमसी इतका पाणीसाठा कमी झाला होता. २०१२ मध्ये या दिवशी पाण्याची पातळी १.१२ टीएमसीपर्यंत घसरली होती. त्यातुलनेत या वर्षी पाणी जास्त आहे. येत्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस होऊन धरणांमध्ये पाणीसाठा होईल, असा विश्वास गणेश बिडकर यांनी व्यक्त केला आहे.शहरामध्ये पालख्यांचे आगमन होत आहे, त्यानंतर रमजानचा सण आहे, अशा काळात पाणीकपातीमध्ये वाढ करता येणार नाही. त्यानंतरही जर पाऊस पडला नाही आणि प्रशासनाला वाटले पाण्याची स्थिती गंभीर होत आहे. त्या वेळी पुन्हा एकदा बैठक बोलावून पाणीकपातीच्या वाढीवर निर्णय घेण्यात यावा, असे बिडकर यांनी स्पष्ट केले. पुण्यामध्ये दरवर्षी जुलै, आॅगस्टमध्ये चांगला पाऊस होत असल्याच्या सरासरीवरून स्पष्ट होत आहे, त्यामुळे जुलै महिन्यात धरणाच्या पाणीसाठ्यात वाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धरणांमधील पाऊस शंभरीही गाठेना!
By admin | Published: June 29, 2016 12:52 AM