लोणावळा : शुक्रवारी सकाळपासून शहर व परिसराला पावसाने अक्षरश: झोडपले. सुमारे चार तास झालेल्या जोरदार वृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक सोसायट्या, घरांत पाणी शिरून रस्ते जलमय झाले होते. सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान १५५ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी नऊ ते दुपारी एक या चार तासांत झालेल्या जोरदार पावसाने शहरातील बहुतांश लहान-मोठे रस्ते पाण्याखाली गेले होते. मावळा पुतळा चौकातील नवरत्न चिक्कीसमोरचा रस्ता, निलकमल थिएटरसमोरचा रस्ता, परमार हॉस्पिटल, गुरुद्वारा, निसर्गनगरी, हरनाम हेरिटेज सोसायटी, भांगरवाडी दामोदर कॉलनी, ट्रायिज मॉल, नारायणी धाम, तुंगार्ली गावाकडे जाणारा रस्ता, वलवण, नांगरगाव, सुमित्रा हॉल या बहुतांश सर्व भागातील रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक सोसायट्या व घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिक भयभीत झाले होते. दुपारी एकनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने रस्त्यावरील पाणी काही प्रमाणात कमी झाले होते. पावसाळापूर्व कामात योग्य प्रकारे नालेसफाई न झाल्याने पाण्याचे लोंढे रस्त्यावरून वाहत होते. दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पुन्हा रस्त्यावर पाणी साचले होते. अनेक शाळा दुपारी सोडण्यात आल्या. नगर परिषदेने शनिवारी शाळेला सुटी जाहीर केली आहे.नैसर्गिक नाले अडविल्याने राजमाची गावाचा रस्ता पाण्यातकुणेगाव येथील डेल्ला अॅडव्हेंचर व कल्पतरू या दोन बड्या बांधकाम व्यावसायकांनी डोंगरावरून वाहणारा नैसर्गिक नाला उंचच्या उंच भिंती घालून अडविल्याने राजमाची गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी तुंबले होते. कुणेगाव ग्रामपंचायतीने ही बाब वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नजरेसमोर आणून दिली होती. मात्र, प्रशासनाने लक्ष न दिल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. अखेर कुणेगावचे सरपंच रामदास पांडवे व उपसरपंच संजय ढाकोळ यांनी पोकलॅन मशिनने सदर भिंत तोडल्यानंतर पाण्याला मार्ग मोकळा झाला.(वार्ताहर)>नाले तुंबून पाणी रस्त्यावरगणपती मंदिर भैरवनाथनगर येथे पावसाच्या तडाख्याने नाला तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आल्याने लोणावळा-पवनानगर हा राज्य मार्ग जवळपास अर्धा किमी अंतर पाण्याखाली गेला होता. जवळपास तीन फूट पाणी रस्त्यावर साचल्याने काही काळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता.
पावसाने जनजीवन विस्कळीत
By admin | Published: August 06, 2016 1:16 AM