जळगाव/धुळे/नगर/सातारा : खान्देशातील जळगाव व धुळे जिल्ह्यातील काही भाग तसेच अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह रविवारी पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात यावल येथे वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान झाले, तर साकळी येथे घराची पत्रे डोक्यावर पडल्याने समाधान सुरवाडे हा १५ वर्षीय मुलगा जखमी झाला.
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने खान्देशात उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. साकळी परिसरात केळी पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे पाऊण तास वादळी पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात शिरपूरला वादळासह पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला. काही भागात झाडे उन्मळली. मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रंगनाथ स्वामींची निगडी व वेलंग या दोन गावांना झोडपून काढले. वादळी वाºयासह सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने रहिमतपूर-कोरेगाव रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती.वाºयाबरोबरच विजांचा कडकडाट सुरू होऊन जोरदार पावसास सुरुवात झाली. तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेतात पाणीच पाणी साचले होते.
ढेकळं फुटली.. उसाच्या सऱ्या भरल्या !यंदा उन्हाळी पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतात नांगरलेली ढेकळं तशीच होती. पाण्याअभावी ऊसही करपून गेला होता. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलले होते. अशावेळी झालेल्या पावसामुळे ढेकळे फुटून विरघळून गेली. तर उसाच्या सºया तुडुंब भरून वाहिल्या.