ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 21- जिल्ह्याला गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे तेथिल नद्यांना पूर आले आहेत. पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख तेरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर-सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने कोल्हापुरला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून, सध्या 38 फूट 5 इंच इतकी पाणी पातळी आहे. जर पाण्याच्या पातळीत आणखीन 7 इंचानी वाढ झाली तर कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण 86 टक्के भरलं आहे. तर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती मिळते आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर अजूनही कायम असून जिल्हा प्रशासन एनडीआरएफच्या संपर्कात आहे. तेथिल पूरस्थितीमुळे रत्नागिरी- कोल्हापूर मार्गाला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन शिवाजी पुलावरील वाहतूक बंद करण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे गगनबावडा-कळे मार्गावर पाणी साचल्याने त्या मार्गावर पाच खाजगी बसेस अडकल्याची माहिती मिळते आहे. रात्री एक वाजल्यापासून या बसेस गगनबावडा-कळे मार्गावर अडकल्या आहेत. या पाच बसेसमध्ये मिळून जवळपास 250 ते 300 प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे. हे सगळे प्रवासी सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. गगनबावडा-कळे मार्गावरून जाणाऱ्या कोल्हापूर ते पुणे या मार्गाच्या त्या बसेस आहेत. काही वेळातच जिल्हा परिषदेची टीम घटनास्थळी दाखल होइल, अशी माहिती मिळते आहे. पावसामुळे 129 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गुरूवारी रात्रीपासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. गगनबावडा-कळे मार्गावर तसंच इतर भागात सगळीकडे पाणी साचल्याने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाजूच्या कळेगावाची मदत घ्यावी लागणार आहे.
नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी
कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे गुरूवारी नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं. त्यामुळे वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास पार पडला. नृसिंहवाडीतील दत्ताच्या मुख्य मंदिरात पुराचं पाणी गेल्यानंतर तेथे दक्षिणद्वार सोहळा होतो.