- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत जास्तीचा पाऊस पडतो, त्याला पालिका कशी जबाबदार, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांवरील खड्डे, तुंबणारी मुंबई आणि वाहतूककोंडीच्या मुद्द्यांवरून शिवसेनेवर होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. मुलुंड येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कालिदास नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या ‘सोनूऽ साँग’च्या माध्यमातून आरजे मलिष्काने पालिका कारभाराची खिल्ली उडवली होती. या व्हिडीओत खड्ड्यांपासून वाहतूककोंडीपर्यंत पालिकेला जबाबदार धरण्यात आल्याने शिवसेनेचा तीळपापड झाला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. जरा काही झाले की महापालिकेवर खापर फोडले जाते. मुंबईत पाऊस जोरात पडतो, त्याला महापालिका तरी काय करणार? गदारोळ आणि आरोप करणे सोपे असते. मुंबईत सध्या बराच पाऊस पडतोय. पण कुठेही तुंबातुंबी झाली नाही. संपूर्ण पावसाळा कुठेही पाणी न तुंबता जाईल. पण इतर शहरे आणि नद्या तुंबताहेत, असे सांगून मुंबईच्या प्रत्येक कामात घोटाळा शोधणारे ‘घोटाळेबाज’ आता कुठे आहेत, असा सवालही ठाकरे यांनी केला. रस्ते, पाणी, शाळा, रुग्णालयांप्रमाणे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची नाट्यगृहे असायला हवीत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाकवी कालीदास नाट्यमंदिरामुळे मुंबईच्या वैभवात आणखी भर पडली आहे. या वास्तूमुळे घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले आहे, असे ठाकरे म्हणाले.
मुंबईत पाऊसच जोरदार, महानगरपालिका काय करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:42 AM