मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले असून, गेल्या २४ तासांत मुंबईत १०४.२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या पावसाने शहरासह उपनगरात काही वेळ घेतलेली विश्रांती वगळता सर्वत्रच पावसाचा तुफान मारा सुरूच आहे.शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत कोसळलेल्या पावसामुळे भायखळा, माझगाव, परळ, भेंडीबाजार, पायधुनी, वाडीबंदर, बोरीवली, अंधेरी पश्चिम येथे पाणी साचले होते. महापालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षामार्फत घटनास्थळी कामगार पाठवून येथील पाण्याचा निचरा करण्यात आला. पावसावेळी शहरात १ आणि पश्चिम उपनगरात १ अशा दोन ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग पडला. शहरात २ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ५, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ७ ठिकाणी झाडे पडली. शनिवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप घेतली. दुपारी तुरळक ठिकाणी बरसणाऱ्या पावसाने सायंकाळसह रात्री मात्र चांगलाच जोर पकडला. मरिन ड्राइव्ह, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, प्रभादेवी, माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ आणि अंधेरी येथे पावसाचा जोर सर्वाधिक होता. (प्रतिनिधी)>राज्याला इशारा१८ सप्टेंबर : कोकणासह गोव्यात अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल.१९ सप्टेंबर : कोकणासह गोव्यात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.२० सप्टेंबर : कोकणासह गोव्यात मुसळधार पाऊस पडेल.
मुंबईला पावसाचा तडाखा
By admin | Published: September 18, 2016 5:03 AM