नागपूर/लातूर/जालना : विदर्भात रविवारीही परतीच्या पावसाच्या जोर कायम होता. शनिवारी रात्री उशिरापासून सुरू झालेल्या पावसाची रविवारी दिवसभर संततधार सुरू होती. नागपूरमध्ये ७.९ मिमी. पावसाची नोंद झाली. परतीच्या पावसाचा पिकांना चांगला फायदा होणार आहे. रविवारी नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पाऊस झाला. लातूर तालुक्यातील बामणी येथील जाना नदीवरील पूल शनिवारी सायंकाळी पुरात वाहून गेला. रविवारी दिवसभर वाहतूक बंद होती. निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे सहा महिन्यांपूर्वी बांधलेला नवा पूल वाहून गेला. त्यामुळे शिरोळ-वांजरवाडा-गिरकचाळ-वळसांगवी गावकऱ्यांना पर्यायी रस्त्याने जावे लागत आहे. तर जिल्ह्यात आष्टी - सेलू मार्गावरील सेलगांव जवळील कसूरा नदीवरील पूल पहिल्याच पावसाळ््यात खचला आहे.
एका बाजूची भिंत कोसळल्याने पूल धोकादायक बनला आहे. वर्षभरापूर्वी कसूरा नदीवर १५ लाख खर्चून पूल बांधण्यात आला होता. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सेलगाव येथे मित्रासह पोहण्यास गेलेल्या पांडुरंग वैराळे (१३) याचा रविवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. ‘उजनी’ दोन दिवसांत ओव्हर फ्लो !सोलापूर : उजनी धरणाने यंदा टप्प्याटप्प्याने शंभर टक्के साठ्याकडे वाटचाल केली असून दोन दिवसांत धरण ‘ओव्हर फ्लो’ होणार आहे.गेल्या महिन्यापासून ६० टक्केवर स्थिरावलेला पाणीसाठा गेल्या आठवड्यात पावसामुळे व पुणे जिल्ह्यांतील धरणांतून विसर्ग झाल्याने वाढला आहे. १२३ टीएमसी इतकी क्षमता असणाऱ्या उजनी धरणात सध्या १११.५३ टीएमसी पाणी साठले आहे.फरशी पुलाला पुन्हा भगदाडअमळनेर (जि. जळगाव) : बोरी नदीच्या पुलाला पुन्हा भगदाड पडल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी पुलावरच रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या दोन दिवसांत हे तिसरे भगदाड पडले आहे. दोन दिवसांपूर्वी नदीला पूर आल्याने नव्यानेच बांधलेल्या पुलाला दोन ठिकाणी भगदाड पडले होते. रविवारी दुपारी एक मोटारसायकलस्वार पैलाडकडून शहराकडे येत असताना पुलाच्या पश्चिमेला भररस्त्यात मोठा खड्डा पडला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. ४१ तास मृत्यूशी झुंजकेज तालुक्यातील हादगाव जवळील नदी पात्रालगत झाडावर चढून बसलेल्या बाळासाहेब श्रीरंग बचुटे (हादगाव, ता. केज) यांची रविवारी सकाळी प्रशासनाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी सुटका केली. या शेतकऱ्याने ४१ तास पाण्याशी झुंज दिली. दरडी काढण्याचे काम सुरु रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील बाजारपेठेची पुराच्या पाण्याने वाताहात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरडी काढण्याचे काम सुरुच असून महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.
दापोलीत दोघांचा मृत्यू दापोली तालुक्यातील मुरुड किनाऱ्यावर सागर मालुसरे (४०, वाई, सातारा) हा भरधाव गाडी चालवत होता. किनाऱ्यावरील खड्ड्यात त्याची गाडी पलटी होऊन गाडीला जलसमाधी मिळाली. तर दापोलीतील करजगाव येथील प्रकाश बंडबे (५०) यांचा शनिवारी पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. बीडमध्ये पावसाचे आणखी तीन बळीबीड/लातूर : तीन दिवसांच्या धुव्वाधार पावसाने ठिकठिकाणी नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. रविवारी आणखी तिघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. तीन दिवसांत पावसामुळे बळी गेलेल्यांचा आकडा नऊ झाला आहे.धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील रुक्मीण बाबासाहेब जायभाये (४०)नदी पाय घसरून पडल्याने वाहून गेल्या. काही अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. परळी तालुक्यात कन्हेरवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेला आकाश तात्याराव रोडे (२१) हा बेपत्ता झाला आहे. तर बचावलेल्या अरविंद आचार्यवर अंबाजोगाई एसआरटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरुर तालुक्यात रुद्रापूर येथे रुळासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून सचिन बहादुर्गे( १९) याचा बुडून मृत्यू झाला. तर शिरुर तालुक्यातील रायमोहा येथे संदीप गर्जे (२२) हा तरुण शनिवारी दुचाकीसह वाहून गेला होता. रविवारी त्याचा मृतदेह गावाजवळील नदीपात्रात आढळला.‘मांजरा’काठच्या गावांना इशारालातूरसाठी वरदान ठरलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत धरणात जवळपास ९० टक्के पाणीसाठा झाला. पाण्याचा ओघ धरणात सुरूच असून, रात्री कोणत्याही क्षणी मांजरा धरणाची दारे उघडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या ५३ गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सतर्कतेचे आदेश बजावले आहेत.