लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/नाशिक : राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकण व गोव्यात पाऊस सुरुच आहे. मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.राज्याचा एकेक भाग व्यापत पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. नाशिकला जोर कायम मालेगाव व नांदगाव तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. इगतपुरी, पेठ, त्र्यंबक, सुरगाणा या भागात भाताची आवणी केली जात आहे तर अन्य ठिकाणी मका व सोयाबीनच्या लागवडीत शेतकरी व्यस्त आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाणकडे पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३८ टक्के तर संपूर्ण धरण समूहात २९ टक्के पाणी साठले आहे. इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण निम्मे भरले आहे. भावली धरण ४७ टक्के, नांदूरमधमेश्वर बंधारा ८२ टक्के, चणकापूर २६ टक्के, गिरणा २६ टक्के, हरणबारी १३ टक्के इतके भरल्याची माहिती संबधितांकडून देण्यात आली.
कोकण-गोव्यात पावसाची संततधार
By admin | Published: July 04, 2017 4:38 AM