- अतुल कुलकर्णीमुंबई : कृष्णा खोऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे नियंत्रण करण्यासाठी पुण्यात बसवण्यात आलेल्या ‘आरटीडास’ (रियल टाईम डेटा अॅक्विझिशन सिस्टीम) या अत्याधुनिक यंत्रणेचा वापरच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या यंत्रणेचा वापर झाला असता तर मोठी हानी टळली असती, असे या खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे.कृष्णा खो-यात सहा वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी खर्चून जवळपास ७० स्वयंचलित पर्जन्यमापक स्टेशन बसवण्यात आली आहेत. संपूर्ण कृष्णा खो-यात दर १५ मिनिटांनी होणारा पाऊस या स्टेशनच्या सहाय्याने मोजला जातो. हे पर्जन्यमापक स्टेशन्स् पुण्यात बसवलेल्या ‘आरटीडास’ यंत्रणेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पावसाची एकत्रित आणि अचूक माहिती दर पंधरा मिनिटांनी मिळू शकते. ही यंत्रणा वेधशाळेचाही अंदाज अॅटोमॅटिक घेते आणि कोणत्या धरण क्षेत्रात किती पाऊस पडणार आहे, याची नोंद करते. त्यानुसार कोणत्या भागात किती पाऊस पडणार आहे, किती पाऊस पडला आहे आणि खो-यातील सर्व मध्यम व मोठ्या धरणांमधील पाणी पातळी किती आहे, याची अचूक माहिती या यंत्रणेवर पुण्यात एका जागी बसून पहायला मिळते.एवढेच नाही तर धरणांचे दरवाजे उघडले तर त्यातून किती पाणी सोडले गेले, हे ही या यंत्रणेद्वारे कळते. ही यंत्रणा जर पाऊस सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून निरीक्षणाखाली ठेवली गेली असती, तर अनेक गोष्टी कळाल्या असत्या, नियंत्रण करता आले असते. पण याचा वापरच केला गेला नाही. विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी यात लक्ष न घातल्याने धरणातून पाणी सोडण्याचे निर्णय स्थानिक पातळीवर कनिष्ठ अधिकाºयांनी घेतले.धरणातील पाणी वेळीच सोडायला हवे होतेआपल्याकडे धरणात पाणी साठा करुन ठेवण्याची वर्षानुवर्षांची मानसिकता आहे. जमा झालेले पाणी सोडू नका यासाठी सतत राजकीय दबाव येतात हा अधिका-यांचा कायमचा अनुभव असल्याने २ आॅगस्ट रोजी या भागातील धरणांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा असतानाही अधिका-यांना ते पाणी सोडण्याची इच्छा झाली नाही.दोषी अधिका-यांवर कारवाई करू - जलसंपदामंत्रीया बाबत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, मी सगळ्या प्रकाराची माहिती घेतली आहे. दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र या भीषण पावसात परिस्थिती वेगळी होती हे ही नाकारता येणार नाही. कृष्णा खोºयात दरवर्षी २८०० ते ३००० क्युसेक्स पाऊस होतो.मात्र फक्त दोन महिन्यांत ५५०० क्युसेक्स आणि त्यातला तब्बल ३००० क्युसेक्स पाऊस फक्त दहा दिवसांत झाल्यामुळे सगळी धरणे ओव्हरफ्लो झाली. पाणी सोडण्याशिवाय पर्यायच उरला नाही.भविष्यात असे प्रसंग येऊ नयेत म्हणून डॅम आॅपरेटींग सिस्टीमला सॅटेलाईटच्या सहाय्याने जोडता येईल का? याचा तातडीने अभ्यास करुन अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत आहे.
दर पंधरा मिनिटांनी पावसाची नोंद घेणारी ‘आरटीडास’ यंत्रणा वापराविनाच पडून!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 5:59 AM