पुणे : मॉन्सूनला बरसण्यासाठी अनुकूल स्थिती नसल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यात कोठेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. सोमवारी देखील जोरदार पावसाची नोंद झाली नाही.राज्यात मॉन्सून सक्रिय असण्यासाठी अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होणे गरजेचे असते. गेल्या आठवड्यात असे पट्टे तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र, आता हे पट्टे विरल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.गेल्या २४ तासांत कोकण, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा कोरडाच होता. विदर्भातील मोहाडीफाटा येथे सर्वाधिक ७० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यापाठोपाठ भामरागड येथे ६०, दर्यापूरमध्ये ३०, भिरा, मालवण, मुरूड, पनवेल, रोहा, विक्रमगड, इगतपुरी, महाबळेश्वर, ओझरखेडा, सुरगाणा, एटापल्ली, गोंदिया येथे २०, अंबरनाथ, चिपळूण, हर्णे, जव्हार, कर्जत, खालापूर, माथेरान, मुंबई, पोलादपूर, शहापूर, पाली, ठाणे, उल्हासनगर, वेंगुर्ला, पेठ, चिखलदरा, हिंगणघाट, साकोली, लाखनी येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.घाटमाथ्यांवरही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत अंबोणे, शिरगाव, डुंगरवाडी, दावडी, ताम्हिणी घाटात ३०, भिरा, लोणावळा घाटात २०, कोयना, खंद, शिरोटा, वळवण, खोपोली, कोयना, धारावी घाटात १० मिमी पावसाची नोंद झाली.पुढील २४ तासांत कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यात पावसाचा जोर ओसरला
By admin | Published: August 18, 2015 1:30 AM