पुणे : कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील चार दिवसांत राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा असून, पुढील २ ते ३ दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने येत्या आठवड्यात मध्य व उत्तर भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात राज्यातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यातील माथेरान ३०, अंबरनाथ, दोडामार्ग, कर्जत, राजापूर, सांगे, सावंतवाडी २० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बहुतांश ठिकाणी हलक्या सरी आल्या होत्या. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, राधानगरी ३०, गगनबावडा, इगतपुरी २० मिमी पाऊस झाला. विदर्भात चिखलदरा २०, आमगाव, बाळापूर, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, गोरेगाव, मोताळा, सडक अर्जुनी, सालेकसा, तुमसर, यवतमाळ १० मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरील अम्बोणे, कोयना ५०, शिरगाव, ताम्हिणी ४०, शिरोटा, वाणगाव, दावडी ३०, डुंगरवाडी २०, लोणावळा ६० मिमी पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी दिवसभरात महाबळेश्वर १६, सातारा २, मुंबई २, नागपूर ४ मिमी पाऊस झाला. २७ ते २९ जुलैदरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील २६ जुलै ते १ आॅगस्टचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. १ जून ते २५ जुलैपर्यंत देशात सरासरीच्या ३ टक्के कमी पाऊस झाला असून, मध्य भारतात सरासरीच्या १६ टक्के, दक्षिण भारतात ९ टक्के जादा पाऊस झाला आहे. पूर्व व उत्तरपूर्व भारतात सरासरीच्या ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे. दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र असून, त्यामुळे या भागात पाऊस होत आहे़ येत्या २ ते ३ दिवसांत पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व लगतच्या प्रदेश या आतापर्यंत कमी पाऊस झाला.
राज्यात पाऊसमान सामान्य राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 2:17 AM