मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये रविवारी अवकाळी पाऊस झाला. विदर्भात पावसाबरोबरच झालेल्या गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, सांगली, सातारा, जळगाव व नगर जिल्ह्यातही रविवारी बेमोसमी पाऊस झाला. नगरमध्ये वादळी वाऱ्याच्या तडाख्यात घराच्या छतावरून पाण्याच्या हौदात पडल्याने सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला.विदर्भात यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. रविवारी दुपारी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, परतवाडा आणि चिखलदऱ्यात वादळी पाऊस झाला. चांदूरबाजार तालुक्याला गारपिटीने झोडपले. यवतमाळमध्ये ५९ गावांना गारपिटीचा फटका बसला. चंद्रपूरमध्येही रविवारी काही तालुक्यांत पाऊस झाला. मराठवाड्यात बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील बलसूरमध्ये गारा पडल्या. नाशिकमध्ये दुपारी ४नंतर अर्धा तास पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये रविवारी दुपारी सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्या. वादळी व बेमोसमी पावसाने येथे दोन-अडीच तास थैमान घातले होते. यामुळे गहू, हरभरा, मका, कांदा व भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली. सांगली, साताऱ्यात गारांसह पाऊस बरसला. त्यामुळे भाजीपाला, द्राक्षबागांसह बेदाण्याचेही नुकसान झाले. सांगली जिल्ह्यात दुष्काळी कवठे महांकाळ, जत, आटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नगरमध्ये बालिकेचा मृत्यू नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यात घराच्या छतावरून पाण्याच्या हौदात पडल्याने कोकणगाव येथे स्नेहल चौरे (७) हिचा मृत्यू झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने ही दुर्घटना घडली. हवामान खात्याचा इशारा : दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाच्या तयार झालेल्या पट्ट्यामुळे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे़