नागपूर/ अकोला : मराठवाड्यात थैमान घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी विदर्भावर ‘अवकाळी’ बरसली. यवतमाळ, अकोल्यासह बुलडाणा, वाशिम तसेच चंद्रपूर, गडचिरोलीला वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने झोडपले. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.यवतमाळ जिल्ह्यात दुपारी ४च्या सुमारास दारव्हा, दिग्रस, कळंब, यवतमाळ आदी तालुक्यांत गारपीट व पावसाने हजेरी लावली. दारव्हा तालुक्यातील बोरीअरब परिसराला गारपिटीने झोडपून काढले. काही ठिकाणी बोराएवढ्या गारा कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतातील गहू, हरभरा, संत्रा आदी पिकांना त्याचा फटका बसला आहे. दिग्रस तालुक्यातही सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, घुग्घुस, मूल, सावली आदी तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. गडचिरोलीत रात्री ८च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)आजही पावसाची चिन्हे : राज्यात शुक्रवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथे पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली येथे पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे़बुलडाण्यातजोरदार बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, चिखली, शेगाव, खामगाव, मेहकर तालुक्यासह जिल्ह्यात दुपारी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या वर्षी चांगल्या पिकाची अपेक्षा शेतकरी करीत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. जिल्ह्यात असलेल्या फळबागांनाही पावसाचा फटका बसला आहे. संत्रा गळून पडला असून, आंब्याचा मोहोरही गळला आहे. वाशिम जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मानोरा, मंगरूळपीर, शेलुबाजार परिसरात काही गावांना गारपिटीने झोडपले.
विदर्भातही अवकाळी पाऊस
By admin | Published: March 17, 2017 3:58 AM