लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली असून, दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत बनली. पुढील तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. कोयना धरणाची पाणी पातळी दिवसभरात ३ टीएमसीने वाढली आहे. तापोळा-महाबळेश्वर रस्त्यासह अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, त्याचा वाहतुकीवर परिणाम होत वाहतूक विस्कळीत झाली. मलकापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सांगलीतही सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू असून, इस्लामपूर, सांगलीत अतिवृष्टी झाली आहे.
जाेरदार काेसळणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर बाजारपेठेला पुराने वेढा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पाऊस पडला आहे.
मराठवड्यातील परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने परिसरातील सात गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही तुरळक पाऊस पडला. जोरदार पावसाने रायघोळ आणि पूर्णा नदीला पूर आला होता. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्यात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे अडाण नदीच्या पुरात वाहून गेल्याने देवराव प्रल्हाद मेश्राम (६२) यांचा मृत्यू झाला.