वाशिम/नागपूर/अमरावती : राज्यात सप्टेंबर महिन्यातही पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरपर्यंतच राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २७७ तालुक्यांत शंभर टक्क्यांहून अधिक, तर ७२ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासांपासून विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पावसाने रविवारपासून जाेरदार धडक दिली. ही संततधार साेमवारीही कायम हाेती. नागपूर, गडचिराेली, गाेंदिया, भंडारा, यवतमाळ, अमरावती, वर्धा या विदर्भातील सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात ११ तारखेपर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७५.६० टक्के पाऊस पडला असला, तरी १ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २७७ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.
येथे पडला सरासरीहून अधिक पाऊसशंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी तालुक्यातील १६, नागपूर, चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी १४, नाशिक, अहमदनगर प्रत्येकी १३, गडचिरोली जिल्ह्यातील १२, सोलापूर, सांगली, लातूर आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी १०, सातारा, औरंगाबाद आणि बीडमधील प्रत्येकी ९, जालना आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी ८, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलडाणा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी ७, पालघर, जळगाव, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी ५, वाशिम ४, ठाणे आणि अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी ३, रत्नागिरी, धुळे आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी २, तर नंदूरबार जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे.
६ तालुके तहानलेलेच सहा तालुक्यांत अद्यापही पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात रत्नागिरी संगमेश्वर, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तर कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा या तीन तालुक्यांचा समावेश आहे.