राज्यभरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, वाशीम, गडचिरोली यासह अन्य ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरिकांनी आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. विधानभवन येथे प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारे आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत असं म्हटलं आहे.
मुंबई व परिसरामध्ये मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. "मी स्वत: सकाळपासून सर्वांना सूचना दिल्या आहेत. पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपात्कालीन यंत्रणा अलर्ट आहेत. जिथे आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या, मदतीच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना त्रास अथवा कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी सूचना देण्यात आले आहेत. नागरिकांना अलर्ट मिळतो तेव्हा घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करतो. काळजी घेण्याची लोकांना विनंती करतो" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि परिसरातील मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलैसाठी पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. २० जुलै रोजी मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. २१ जुलै रोजी पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दिला आहे.