लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईसह राज्याकडे पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे. तर, सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक नाही, त्यामुळे ७ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असणार आहे, असे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.
जून, जुलै, ऑगस्ट ३ महिने समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यातही एल - निनो विकसनाकडे जाणारी शक्यता पाहता, पुढे पावसाची अपेक्षा कोणत्या आधारावर करावी?, असेही खुळे यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून अधूनमधून श्रावण सरी कोसळत असतानाच पडत असलेल्या उन्हाने मुंबईकर घामाघूम होत असल्याचे चित्र होते.
पावसाची साशंकता
१ सप्टेंबरनंतर राजस्थानातून मागे फिरणारा परतीचा पाऊस आणि सप्टेंबर महिन्यात बंगाल उपसागरीय शाखेतून चार नक्षत्रांतून पडणाऱ्या पूर्वेकडच्या पावसाची साशंकता आहे.
गेल्या २४ तासांतील मुंबईतला पाऊस (मिमी)
- शहर ६
- पूर्व उपनगर ५
- प. उपनगर ५
२२ ऑगस्टपर्यंतचा पाऊस
- शहर : १७०५ मिमी
- पूर्व उपनगर : १९८१ मिमी
- पश्चिम उपनगर : २०५८ मिमी