मुंबई : महाराष्ट्राचा कोणताही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही. पूर्ण करता येतील अशीच वचने शिवसेना देते आणि दिलेले वचन पूर्ण करतेच, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. एक रूपयात आरोग्य चाचण्या, दहा रूपयांत सकस आहाराची थाळी, वीज दरकपात, दुर्बल घटकातील मुलींचे विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण अशी विविध आश्वासने या वचननाम्यात देण्यात आली.
मातोश्री निवासस्थानी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेनेच्या वचननाम्यात प्रामुख्याने शेतकरी, महिला आणि युवा वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. देशाला मंदीचा विळखा पडतोय, लोकांच्या रोजगाराचा प्रश्नही आहेच. त्यामुळे सरकारी तिजोरीचा विचार करूनच शिवसेनेने वचननामा तयार करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दहा रूपयांत थाळीची योजना आहे. त्यासाठी राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार आहोत. त्यात महिला बचत गटांना सामावून घेण्यात येईल. अल्पभूधारक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी १० हजार रुपये जमा करण्यात येईल, ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करण्यात येईल. तर, आर्थिक दुर्बल घटकांंतील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करण्याची घोषणाही वचननाम्यात करण्यात आली आहे.
यावेळी ठाकरे यांच्यासह खा. अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, मिलिंद नार्वेकर आणि सूरज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवर शहर सडक योजना राबविण्यात येईल. जीएसटीमुळे स्थानिक स्वराज संस्थांकडे निधीची वानवा आहे. त्यामुळे गावांना शहरे आणि जिल्ह्याच्या ठिकाणांसाठी जोडणारी ५० हजार किलोमीटरचे रस्ते बांध्ू. हे रस्ते टिकाऊ असतील. राज्याच्या अर्थसंकल्पातून त्यासाठी तरतूद करण्यात येईल, असे आदित्य यांनी सांगितले.
या वचननाम्यात शिवसेनेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवा आदी घटकांसह ऊर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण, पर्यटन, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांना स्पर्श केला आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतर वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.1अल्पभूधारक व दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी थेट दहा हजार रूपये2आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण3राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी4तालुकास्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५००बसची विशेष सोय5३०० युनिटपर्यंतघरगुती वीजदरात तीसटक्के कपात6राज्यातील सर्व खेड्यातील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण7सर्व जिल्ह्यात सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल8निराधार पेन्शन योजनेतील मानधन दुप्पट करणार9राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे10 गावागावातील धार्मिक स्थळांना अनुदान