सदानंद नाईक,
उल्हासनगर- रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत उदासीन असलेली पालिका विविध कार्यक्रम राबवून जनजागृती करणार आहे. तसेच बांधकाम परवानगी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. नगरसेवकांना याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.उल्हासनगरमध्ये रेनवॉटर हॉर्वेस्टिंग पध्दतीकडे दुर्लक्ष केले. शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काँॅग्रेसच्या नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वत:च्या घरी रेनवॉटर हॉवेस्टिंग करून शहरात नवा आदर्श निर्माण केला आहे. आयुक्त हिरे यांनी सोंडे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महासभेत रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. ‘लोकमत’ राबवित असलेल्या जलमित्र अभियानाचे त्यांनी कौतुक करून शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविणार असल्याची माहिती दिली. शहरात सर्व अटी व शर्तीचे उल्लघंन करून बांधकाम केले जात आहे. पालिकेच्या अहवालानुसार ९५ टक्के बिल्डरांनी इमारतीला पूर्णत्व:चा दाखला घेतला नसल्याचे उघड झाले असून आयुक्तांनी अशा बांधकामांना नोटीसा पाठविल्या आहेत. नोटिशीनंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नाहीतर अशा बिल्डरांवर एमआरटीपीअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. जेथे बांधकामच नियमानुसार केले जात नाही. तेथे रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम परवाना देतानाच बिल्डरांकडून रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत प्रतिज्ञापत्र घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.महापालिका अंदाजपत्रकात रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी तरतूद केली नसली, तरी विशेष तरतूद करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. रेन हार्वेस्टिंगबाबत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविणार असून रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविणारे बंगले, इमारती, लहान-मोठी घरे यांनी मालमत्ता करात सूट देण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. नगरसेविका सोंडे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत प्रशिक्षण घेतले असून विनामूल्य मार्गदर्शन करणार असल्याचे त्या म्हणाल्या. ।भूजल पातळी पूर्ववत करण्यासाठी उचलले पाऊलपालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून महिन्यात २०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या. भूजल पातळी खोल गेली असून काही ठिकाणी ४०० फुटावर पाणी लागत नाही. ही पातळी पूर्ववत होण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविण्याची गरज असल्याचे आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगितले.