- यदु जोशी, मुंबई
राज्यात सर्वत्र पावसाने दडी मारली असताना सोमवारपासून (दि.१३) सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मात्र सरकारवर आरोपांची बरसात होणार आहे. विरोधकांच्या गारपिटीचा सामना करताना देवेंद्र फडणवीस सरकारची कसोटी लागेल.भाजपाच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, सरकारच्या घोषणा आणि त्यांच्या अंमलबजावणीतील विसंगती, शिवसेनेची नाराजी, भाजपांतर्गत समन्वयाचा अभाव, अचानक आक्रमक झालेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पार्श्वभूमीवर अधिवेशन सुरळीत पार पाडण्याचे मोठे आव्हान आठ महिन्यांच्या सरकारसमोर असेल. विरोधकांचे हल्ले परतवून लावण्याची ठोस रणनीती सरकारने अद्याप आखलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि काही निवडक ज्येष्ठ मंत्री रविवारी चर्चा करतील, अशी शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे हल्ले, ‘अरे’ला कारे’ने उत्तर देत परतविण्याचा पवित्रा भाजपा घेणार आहे. पक्षाच्या तरुण आमदारांची एक ‘शाऊटिंग ब्रिगेड’ तयार केली जाणार आहे, अशी माहिती मिळते. शिवसेनेकडून भाजपाला कितपत सहकार्य मिळते, हेही महत्त्वाचे ठरेल. विरोधकांचे टार्गेट!- कायदा, सुव्यवस्था मुख्यमंत्री फडणवीस- चिक्की प्रकरण पंकजा मुंडे- बोगस डिग्री विनोद तावडे, बबनराव लोणीकर- सीडी बॉम्ब राज पुरोहित- वादग्रस्त विधाने राम शिंदे‘फ्लोअर मॅनेजमेंट’ प्रकाश महेतांकडेविनोद तावडे, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांचा फायदा उचलत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास एकदम वाढला आहे. मात्र आघाडी सरकारच्या कार्यकाळातील घोटाळे बाहेर काढण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा लक्षात घेता विरोधी पक्ष बॅकफूटवर तर जाणार नाही ना, अशी शंकाही आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी पदरात पाडून घेण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. सरकारमध्ये एकत्र असूनही भाजपा-शिवसेनेत दिसणारा बेबनाव आणि सत्ता गेल्याने आलेल्या शहाणपणातून एकवटलेले विरोधक, असे या वेळचे चित्र दिसते. विरोधकांशी चांगले संबंध असलेले सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनात नसतील. त्यामुळे ‘फ्लोअर मॅनेजमेंट’मध्ये सरकारला अडचणी येऊ शकतात. ही जबाबदारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर टाकली आहे. विरोधकांचे सगळे आरोप निराधार असल्याचे आम्ही सिद्ध करू. कुठल्याही मुद्द्यावर चर्चेची अधिवेशनात सरकारची तयारी असेल. पण विरोधासाठी विरोध होता कामा नये. सरकारने घेतलेल्या अनेक लोकोपयोगी निर्णयांच्या भक्कम आधारे मोठ्या आत्मविश्वासाने आम्ही अधिवेशनाला सामोरे जाऊ. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीसरकारने कुठले जनहिताचे निर्णय घेतले याचा जाब आम्ही विचारूच, पण राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्यशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही.- राधाकृष्ण विखे -पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा मुख्यमंत्र्यांनी उगाच दबावतंत्र अवलंबू नये. त्यांच्या धमक्यांना आम्ही भिणार नाही. निधड्या छातीने सत्तापक्षाला जाब विचारू. या सरकारने आठ महिन्यांत काय काय करून ठेवले याची चिरफाड करू. - धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद