मुंबई- मोठ्या विश्रांतीनंतर गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी मुंबईकरांची त्रेधा उडवली. पावसामुळे शहरात ३ घरांची पडझड होऊन २ जण जखमी झाले. मुसळधार पावसात समोरचे काहीच दिसत नसल्याने लोकलचा वेग मंदावला. अनेक स्थानकांतील इंडिकेटर्स बंद अथवा चुकीची वेळ दाखवत होते. चाकरमान्यांची आॅफिसला जाताना आणि घरी परतताना चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईत वर्षाला सरासरी २३५ सेंटीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत कुलाब्यात २०९ सेंटीमीटर तर सांताक्रुझ येथे २५१ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा यंदा कुलाबा येथे १४.४ तर सांताक्रुझ येथे ३७.७ सेंटीमीटर अधिक पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली. संध्याकाळपर्यंत शहर परिसर ४०.३९ मिलीमीटर, पूर्व उपनगर ६५.१५ मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात ८३.४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने आजघडीला मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९९ टक्के भरले आहेत. मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा अपेक्षित असताना, २० सप्टेंबर २०१५ रोजी तलावांमध्ये केवळ १० लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा होता. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर २० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. - आणखी वृत्त/२
पाऊसफुल्ल दिवस
By admin | Published: September 21, 2016 6:30 AM