मुंबई : राज्यातील काही भागांतील किमान तापमानाचा पारा खाली घसरला असतानाच येत्या ७२ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २४ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य अरबी समुद्राच्या काही भागावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ वायव्य दिशेला सरकत आहे. गेल्या चोवीस तासांत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)३ नोव्हेंबर : दक्षिण कोकण-गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.४ नोव्हेंबर : दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.५ नोव्हेंबर : दक्षिण कोकण-गोव्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.६ नोव्हेंबर : दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.
थंडीतही पावसाचा इशारा!
By admin | Published: November 03, 2015 3:07 AM