बारामती / इंदापूर : बारामती, इंदापूर तालुक्यात मंगळवारी (दि. २८) दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी ३ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. आजच्या पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. बारामतीच्या जिरायती भागाकडे मात्र अद्यापही पावसाने पाठ फिरविली आहे.जून महिन्याच्या अखेरीस पावसाने केलेली सुरुवात शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. मंगळवारी झालेला पाऊस शेतीसाठी पायदेशीर होता. अनेक ठिकाणी शेतांमध्ये आजच्या पावसाने पाणी साठले होते. अनेक दिवसांची चांगल्या पावसाची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. पावसाची अनुकूल सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी, ढेकळवाडी, लिमटेक, बांदलवाडी भागात पाऊस पडला. बागायती भागातील सोमेश्वरनगरसह जिरायती भागात आजदेखील पावसाने पाठ फिरविली.सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावलेली असताना जिरायती भाग कोरडाच आहे. पावसाने पाठ फिरविल्याने पिण्याच्या पाण्यासह, पिकांच्या लागवडीचा प्रश्न कायम आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याची चिंता सतावत आहे. इंदापूरतालुक्यातील लासुर्णे, अंथुर्णे, सणसर, भवानीनगर, वडापुरी, तावशी, निमसाखर आदी भागांत पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकरीवर्गातून आनंद व्यक्त होत आहे. इंदापूर शहरात दुपारी साडेचारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. मागील आठवड्यात पडलेल्या पावसाच्या जोरावर काही ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या. मका, बाजरीसह अन्य खरीप पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)>काहीसा दिलासा : गुणवडीत घराची भिंत कोसळलीआठ दिवस हुलकावणी दिल्यानंतर, खरी पावसाची गरज होती; परंतु पाऊसच झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आज झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकरी सुखावला असून, खरीप पिके तरी चांगले निघावीत, अशी प्रार्थना करीत असताना सर्वत्र दिसत आहे. पिंपळी (ता. बारामती) येथे मंगळवारी (दि. २८) दुपारी २ ते ४ च्यादरम्यान पावसाने दमदार हजेरी लावली. गुणवडी, डोर्लेवाडी या परिसरामध्ये पाऊस झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ठिकठिकाणी पाणी साठले होते. या पावसामुळे गुणवडी येथील अक्षय कांबळे या अनाथ विद्यार्थ्याच्या घराची भिंत कोसळली आहे. या विद्यार्थ्याला आई-वडील नाहीत. या घरामध्ये तो त्याच्या बहिणीसोबत राहत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी या विद्यार्थ्यास मदत करावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.
बारामती, इंदापूरमध्ये दमदार पाऊस
By admin | Published: June 29, 2016 1:04 AM