यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य विधिमंडळाचे ७ सप्टेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन विधान भवनात घेण्याऐवजी समोरील बाजूस असलेल्या पार्किंगच्या मोठ्या जागेत मंडप उभारून घेतले जाण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी पाठविला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सभागृहाच्या बाहेर अधिवेशन घेण्यासंदर्भातील तयारीचा आढावा घेतला. विधान परिषदेचे कामकाज विधान भवनात शारीरिक अंतर राखून करता येऊ शकेल आणि विधानसभेचे कामकाज हे सभागृहाच्या बाहेर वॉटरप्रूफ वातानुकूलित मंडप उभारून त्या ठिकाणी घ्यावे, असे प्रस्तावित आहे. तसे झाल्यास विधान भवनाबाहेर भरलेले हे पहिले अधिवेशन असेल. पार्किंगची जागा अधिवेशनासाठी घेतल्याने पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार आहे. आजूबाजूच्या काही खासगी व शासकीय इमारतींमधील पार्किंगची जागा त्यासाठी घेण्याचा विचार सुरू आहे. खासगी कार्यालयांमध्ये १० टक्केच कर्मचारी उपस्थितीने कामकाज होत असल्याने जवळच्या बहुमजली इमारतींमध्ये पार्किंगची मोठी जागा उपलब्ध होऊ शकते.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक ७ आॅगस्टला होणार आहे. त्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेषा निश्चित केली जाईल आणि पार्किंगच्या मोकळ्या जागेत मंडप उभारून विधानसभा भरविण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.गेल्या आठवड्यात पुड्डुचेरी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सभागृहाबाहेर मंडप टाकून उर्वरित अधिवेशन पार पडले.राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न, पुरवणी मागण्यांना मंजुरी आणि विधेयकांना मंजुरी हे पावसाळी अधिवेशनातील मुख्य कामकाज असते. दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक अंतर असून नये, हा नियम आजवर अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता पाळला गेला आहे. त्या दृष्टीने १४ सप्टेंबरपूर्वी अधिवेशन घेणे आवश्यक आहे.बैठकीत अंतिम निर्णय घेणारअधिवेशन होईलच. अधिवेशनाच्या निमित्ताने विधान भवनात होणारी गर्दी, शारीरिक अंतराचा प्रश्न हे मुद्दे लक्षात घेऊन समोरील पार्किंगच्या जागेत विधानसभेचे कामकाज चालवावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ७ तारखेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल.- नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा