यदु जोशी, मुंबईकोट्यवधी रुपयांच्या नियमबाह्ण खरेदीमुळे चर्चेत असलेल्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांच्या मानधनात महिन्याकाठी हजार रुपयांची कपात सुरू आहे. विशेष म्हणजे आधी त्यांना मानधनवाढ दिली गेली आणि आता कपात केली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय २१ मार्च २०१४ रोजी घेतला होता. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्याचे ठरले होते. त्यानुसार अंगणवाडी सेविकांच्या मासिक मानधनात ९५० रुपये वाढ करून ते ५ हजार रुपये करण्यात आले तर अंगणवाडी मदतनीसांचे मानधन ५०० रुपयांनी वाढवून ते २ हजार ५०० रुपये व मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५०० रुपयांनी वाढवून ३ हजार रुपये करण्यात आले होते.शहरी भागातील सेविका/ मदतनिसांना फेब्रुवारी २०१५ पर्यंत वाढीव मानधन मिळाले. मार्च आणि एप्रिलचे मानधन एकत्रितपणे मे मध्ये दिले. मात्र ते देताना वाढीव मानधन कापण्यात आले. त्यामुळे सेविकांना मासिक ४०५०, मदतनीसांना २००० तर मिनी अंगणवाडी सेविकांना २५०० रुपये इतके मानधन मिळाले. ग्रामीण भागातील सेविकांना तर एप्रिल २०१४ नंतर दोन-तीन महिनेच वाढीव मानधन देण्यात आले आणि नंतर पुन्हा मूळ मानधन सुरू झाले.
आधी वाढवले, मग कापले
By admin | Published: June 25, 2015 1:29 AM