मुंबई - राज्यामध्ये भाजपासमोर प्रबळ आव्हान उभे करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून भारिप, मनसे अशा पक्षांना आघाडीमध्ये सामावून घेण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चाचपणी सुरू आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्या दिवशी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आघाडीबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. विवाह सोहळ्याच्या लगबगीतही राज ठाकरे वेळात वेळ काढून अहमद पटेल यांना खासगीत भेटले. तसेच त्यांच्यात सुमारे 20 मिनिटे चर्चा झाल्याचे वृत्त होते. मात्र या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली. याची माहिती मात्र उघड झालेली नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रस्ताव दिल्याचे वृत्त आले होते. मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील एकेक जागा दिल्यास मनसेचं 'इंजिन' राष्ट्रवादी - काँग्रेस आघाडीला जोडण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे तयार असल्याचे वृत्त लोकमतने परवा प्रसिद्ध केले होते. ईशान्य मुंबई, ठाणे आणि दिंडोरी या लोकसभेच्या तीन जागा मनसेला मिळाव्यात, अशी राज ठाकरेंची मागणी आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच विचार करताहेत. अगदीच तीन नाही, पण दोन जागा राष्ट्रवादी मनसेसाठी सोडेल आणि नवा मित्र जोडेल, असं खास सूत्रांनी सांगितले होते.
राज ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात महाआघाडीसाठी खलबते?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 8:26 PM