मुंबई : बेकायदेशीररित्या होर्डिंग लावणार नाही. संबंधित विभागाकडून आवश्यक त्या परवानगी घेण्यात येतील, अशी हमी वैयक्तिकरित्या देऊनही नवरात्रौत्सव आणि दिवाळीच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भाजप कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे होर्डिंग लावले. त्यामुळे उच्च न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यावर अवमान कारवाई करण्याचे संकेत मंगळवारी दिले.या संदर्भातील आदेश २० नोव्हेंबर रोजी देऊ, असे न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने म्हटले. मुंबई व राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांच्या हद्दीत बेकायदेशीर होर्डिंग, पोस्टर, बॅनर लावण्यात येत असल्याने महापालिकांना कारवाईचे आदेश द्यावेत व राज्य सरकारला बेकायदेशीरपणे होर्डिंग्स, बॅनर व पोस्टर लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.या याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने प्रत्येक राजकीय पक्षाला बेकायदेशीररीत्या होर्डिंग्स, बॅनर व पोस्टर लावण्यात येणार नाहीत, तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात येतील, अशी हमी देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) यांनी उच्च न्यायालयाला लेखी हमी दिली, तर राज ठाकरे आणि आशीष शेलार यांनी वैयक्तिक हमी दिली होती.मंगळवारी सुनावणीदरम्यान याचिकाकर्ती संस्था सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे अॅड. उदय वारुंजीकर यांनी नवरात्रौत्सव व दिवाळीदरम्यान राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब निदर्शनास आणली. त्यात मनसे आणि भाजपचाही समावेश असल्याने खंडपीठाने हमी देणाऱ्यांवर अवमान कारवाई करू, अशी तंबी दिली. (प्रतिनिधी)
राज ठाकरे, आशिष शेलारांवर कारवाईची टांगती तलवार
By admin | Published: November 18, 2015 3:06 AM