सोशल मीडियावर सध्या राजकीय वातावरण तंग असून सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते वाईट पद्धतीने कमेंट, प्रतिक्रिया देत आहेत. अनेकदा एखाद्या नेत्याला वाईट, अश्लिल कमेंटद्वारे ट्रोलही केले जात आहे. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे भडकले असून अशा कार्यकर्ते, नेत्यांना आधी मनसेचा राजीनामा देण्याचे फर्मान सोडले आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी इतर पक्षांचे माहिती नाही, परंतू मनसेत हे खपवून घेणार नाही, अशी तंबीच कार्यकर्त्यांना भरली आहे.
सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही., अशा शब्दांत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना फटकारले आहे.
माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा, असा कठोर इशारा राज यांनी दिला आहे. तसेच ही समज नाही तर ताकीद आहे, असेही राज यांनी म्हटले आहे.