04 May, 22 01:42 PM
रत्नागिरीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रोखले, पोलिसांनी काहींना घेतलं ताब्यात
रत्नागिरीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले असून, यापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
04 May, 22 01:27 PM
अनधिकृत मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना राज्य सरकारची अधिकृत परवानगी? राज ठाकरे
राज्यात अनेक अनधिकृत मशिदी आहेत, त्यावरील भोंगेंही अनधिकृत आहेत. आणि राज्य सरकार त्याला अधिकृत परवानगी देते कशी, असा रोकडा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
04 May, 22 01:25 PM
आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय करते, तेही आता पाहणार: राज ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणी निकाल दिला आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल, तर आता सर्वोच्च न्यायालय काय करते, हे पाहणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
04 May, 22 01:22 PM
महाराष्ट्रात दंगे नकोत पण भोंगे खाली उतरलेच पाहिजेत: राज ठाकरे
महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात ही आमची मुळीच इच्छा नाही. तसे होऊही नये. मात्र, भोंगे खाली उतरलेच पाहिजे. कुणाच्याही प्रार्थनेवर आक्षेप नाही. ज्याने त्याने आपली प्रार्थना आपल्या घरातच म्हणावी. त्याचा कुणालाही त्रास होता कामा नये, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
04 May, 22 01:20 PM
भोंग्यांच्या विषयाला धार्मिक रंग देऊ नका: राज ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. एका दिवसाचा हा प्रश्न नाही. हा धार्मिक प्रश्न नाही, सामाजिक आहे. त्यांनी धर्म मधे आणला, तर आम्हालाही आणावाच लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
04 May, 22 01:18 PM
हा एका दिवसाचा प्रश्न नाही, आंदोलन सुरूच राहणार: राज ठाकरे
मशिदींवरील भोंग्यांचा विषय एका दिवसाचा नाही. याला धार्मिक रंग देऊ नका. भोंगे उतरवत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
04 May, 22 01:11 PM
पहाटे ५ च्या आधी अजान वाजवणाऱ्या मशिदींवर काय कारवाई करणार? राज ठाकरेंची विचारणा
मुंबईतील ११४० पैकी १३५ मशिदींवर पहाचे ५ च्या आधी अजान देण्यात आली. या मशिदींवर पोलीस काय कारवाई करणार, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली आहे.
04 May, 22 01:09 PM
केवळ मशिदींवरील नाही, तर मंदिरांवरील भोंग्यांवरही कारवाई करा: राज ठाकरे
लोकांना होणारा त्रास कमी झाला पाहिजे, हीच मुख्य अपेक्षा आहे. केवळ मशिंदींवरील नाही, तर मंदिरांवरील भोंग्यांवरही कारवाई करावी, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
04 May, 22 01:08 PM
राज्यातील ९२ टक्के भागात सकाळी भोंग्यांवरून अजान झाली नाही: राज ठाकरे
राज्यातील ९२ टक्के भागात पहाटेची अजान भोंग्यांवरून झाली नाही. आम्ही जो विषय मांडतोय, तो मौलवींनी समजून घेतला, त्याबाबत त्यांचे आभार, असे राज ठाकरे म्हणाले.
04 May, 22 01:07 PM
नोटीस फक्त आमच्या बाबतीतच का? राज ठाकरेंचा सवाल
राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र, आम्ही कायद्याप्रमाणे वागत आहोत. नोटीस फक्त आमच्याबाबतीत का, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.
04 May, 22 01:05 PM
काही सूचना आत्ताच देण्यासाठी पत्रकार परिषद
खरं पाहता सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेणार होतो. मात्र, काही सूचना आत्ताच जाणं आवश्यक आहे. म्हणून १ वाजता पत्रकार परिषद घेतोय.
04 May, 22 01:03 PM
राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू; काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
पहाटेपासून सुरू असलेल्या मनसेच्या भोंग्याविरोधातील आंदोलनानंतर आता राज ठाकरे पत्रकार परिषद घेत असून, ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
04 May, 22 12:47 PM
उस्मानाबादमध्ये हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन , एकत्र नमाज व हमुमान चालीसा पठण
मानवता हाच खरा धर्म असल्याचा नारा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत नमाज व हनुमान चालीसा पठण केले. सर्व धर्म एक आहेत, केवळ राजकीय हेतूने सध्याचे राजकारण सुरु आहे. फोडा व राज्य करा ही निती आजही वापरली जात आहे. मात्र तरुणांनी एकत्र यावे असा संदेश यावेळी देण्यात आला.
04 May, 22 12:46 PM
सोलापुरात मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी
सोलापुरात मनसेकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सोन्या मारुती मंदिरातील अॅम्लिफायर जप्त करण्यात आला. यानंतर मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाल्याचे सांगितले जात आहे.
04 May, 22 12:45 PM
मनसेच्या आंदोलनाची हवाच काढली? गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिली माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील असे आम्ही सर्वजण राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. राज्यभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मनसेच्या आंदोलनाची हवाच गेल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
04 May, 22 12:12 PM
राज ठाकरेंची पुढची भूमिका काय? सायंकाळी ६ वाजता घेणार पत्रकार परिषद
बुधवारी पहाटेपासूनच मनसेचे भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू झाले असून, अनेक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. राज ठाकरे आता पुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सायंकाळी ६ वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे म्हटले जात आहे.
04 May, 22 11:48 AM
मुंबईतील वरळीत मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी पोलीस; हर्षल खरात ताब्यात
वरळी बीडीडी चाळीत पोलीस मनसैनिकांना ताब्यात घेण्याचे काम करत आहेत. दुपारच्या सत्रात अजानवेळी गडबड होऊ नये यासाठी सर्व मनसैनिकांना ताब्यात घेतले जाते आहे. वरळीचे मनसेचे पदाधिकारी हर्षल खरात यांच्या घरी पोलिसांनी अचानक धडक देत त्यांना ताब्यात घेतले.
04 May, 22 11:45 AM
मनसैनिकांवरील कारवाईचा वेग वाढला; आतापर्यंत १८ हजार कार्यकर्त्यांना नोटिसा
मुंबईत १ हजार १४० पैकी १३५ मशिंदींवरील भोंग्यांचा वापर केला आहे. आत्तापर्यंत एकूण १८ हजार मनसेच्या कार्यकर्त्यांना १४९ अंतर्गत नोटिसा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिल्या आहेत. राज्यातील ६ भागात अतिरिक्त पोलीस महासंचालक रस्त्यावर उतरले आहेत.
04 May, 22 11:28 AM
मुंबईत मनसैनिकांची धरपकड सुरू; पोलिसांच्या कारवाईला वेग
मुंबईत मनसे नेते तसेच कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी पार्क परिसरातून संदीप देशपांडे यांना पोलीस ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते मात्र ते गाडीतून निघून गेले. मुंबई पोलीस रात्रीपासून त्यांचा शोध घेत होते.
04 May, 22 11:10 AM
मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे, संतोष धुरी, शिवतीर्थावर दाखल
मनसेचे नेते आणि पदाधिकारी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर पोहोचले आहेत. राज ठाकरे दुपारनंतर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
04 May, 22 11:04 AM
कोल्हापुरात मशिदीमध्ये नेहमीप्रमाणे अजान, पण कोणाकडूनही विरोध नाही
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ४०० मशिदीमध्ये नेहमीप्रमाणे आजान झाली आणि त्याला कोणाकडूनही विरोध झाला नाही.
04 May, 22 11:01 AM
नाशकात १५ मनसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नाशिक येथील हायवेलगत असलेल्या एका हॉटेलमध्ये पहाटेच्या सुमारास एकत्र येऊन काही मनसे कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारी करत होते. पोलिसांना याची कुणकुण लागताच हॉटेलमध्ये धाड टाकून १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
04 May, 22 10:59 AM
नाशिक शहरात मुस्लीमबहुल भागातील सर्वच मशिदींबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
नाशिक शहरातील जुने नाशिक, वडाळागाव, देवळाली गाव, विहितगाव आदी मुस्लीमबहुल भागातील सर्वच मशिदींबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात.
04 May, 22 10:37 AM
वसंत मोरे गेले कुठे? भोंगा आंदोलनात सहभाग नाही; नॉट रिचेबल असल्याचे चर्चांना उधाण
मनसेकडून राज्यात सर्वत्र मशिदींसमोर भोंगे लावण्यात येत असताना पक्षाचे नेते वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाही. उलट मंगळवारपासून वसंत मोरे नॉटरिचेबल झाले आहेत.
04 May, 22 10:23 AM
मुंबईच्या लोकलमध्ये हनुमान चालीसा पठण
राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मनसैनिकांनी हनुमान चालीसा लावली. मुंबईकरांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद देत मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हनुमान चालीसा पठण केल्याची माहिती देण्यात आली आहे.
04 May, 22 09:59 AM
मालेगावात पहिल्यांदाच भोंग्याविना अजान; वरिष्ठ पोलीस अधिकारी ऑन फिल्ड
भोंग्यांविरोधात आंदोलन करण्याचे आदेश दिल्याने मुस्लिम बहुल मालेगावसह नाशिकच्या ग्रामिण भागात पोलिस यंत्रणा सतर्क असून सर्व वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. मालेगावात बहुतेक महत्वाच्या मशिदींमध्ये नमाज भोंग्याविनाच करण्यात आले.
04 May, 22 09:46 AM
नाशिक शहरात जुने नाशिक, पंचवटी भागात राज्य राखीव दलाचे जवान तैनात
पहाटेच्या सुमारास जुने नाशिक भागात अजान सुरू होण्याच्या वेळेस एक मशिदीबाहेर जमलेल्या मनसेच्या सुजाता डेरे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले.
04 May, 22 09:28 AM
भंडारा जिल्ह्यातील सर्व मशिदींसमोर पोलीस बंदोबस्त
राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, भंडारा जिल्ह्यातील सर्व मशिदींसमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांची गस्त, राज्य राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.
04 May, 22 09:20 AM
राज ठाकरेंनी केला बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्विट
भोंग्यांबाबत मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत असून, राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
04 May, 22 09:11 AM
वर्धा: भोंग्याचे ‘राज’कारण; पोलीस यंत्रणा ‘अर्लट’
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा पोलीस दलही अधिक सतर्क झाले असून जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर करडी नजर ठेवून आहे.
04 May, 22 09:04 AM
बुलढाण्यात हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी लाऊडस्पिकर घेतले ताब्यात
बुलढाण्यातील खामगाव शहरातव्या चांदमारी भागातील हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी लाऊडस्पिकर मशीन ताब्यात घेतल्याची घटना घडली. तर जळगाव जामोदमध्ये पोलीस बंदोबस्तात हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
04 May, 22 08:49 AM
राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांचे बॅरिकेटिंग; मोठ्या संख्येने कार्यकर्ते येण्याची शक्यता
औरंगाबाद येथील सभेनंतर आता मनसेने भोंग्यांच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला असून, राज्यभर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेंटिंग सुरू केले असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
04 May, 22 08:39 AM
अजान लागली नाही, म्हणून हनुमान चालिसा नाही: संदीप देशपांडे
मुस्लिम बांधवांनी संमजसपणा दाखवत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांचं कौतुक आहे. जिथे अजान झाली नाही तिथे हनुमान चालिसा लावण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
04 May, 22 08:35 AM
सोलापूर: करमाळा शहरात पोलिसांचा चौकाचौकात बंदोबस्त
करमाळा शहरात पोलिसांचा चौकाचौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक मनसे पदाधिकाऱ्यांवर पोलिसांचा वॉच असल्याची माहिती देण्यात आली आहे.
04 May, 22 08:25 AM
सोलापूर: पंढरपुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे नजरकैदेत
सोलापूर येथेही पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून, पंढरपुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे नजरकैदेत आहे. तर सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा आल्या आहेत.
04 May, 22 08:15 AM
मनसे इम्पॅक्ट! माहीम, मुंब्रा, भिवंडी मालेगाव, पुणेसह अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान
राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते सक्रीय झाले असून, मुंबईसह काही ठिकाणी अजानावेळी हनुमान चालीसा लावण्यात आली. मात्र, दुसरीकडे माहीम, मुंब्रा, भिवंडी मालेगाव, पुणेसह अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान झाल्याची माहिती मिळाली असून, मशिदींबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
04 May, 22 08:11 AM
औरंगाबादमध्ये मनसैनिक झाले भूमिगत
पोलिसांनी १४९ च्या नोटिसा बजावत आणि गुन्हे दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर अटक होऊ नये, यासाठी शहरातील मनसेचे अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले आहेत. यामध्ये जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राजीव जावळीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
04 May, 22 08:00 AM
नाशिकमध्ये २९ मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमध्ये सकाळपासूनच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मनसेच्या २९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी काही जणांना तडीपारीच्या नोटिसा बजावत कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
04 May, 22 07:59 AM
नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू
नवी मुंबईतही पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून, येथील मनसे कार्यकर्त्यांची धडपकड पोलिसांनी सुरू केली आहे. मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष प्रसाद घोरपडे यांना अटक करण्यात आली आहे.
04 May, 22 07:57 AM
औरंगाबाद येथे पोलिसांनी विशेष खबरदारी
राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादमधील अनेक मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
04 May, 22 07:56 AM
मुंबई पोलीस ऑन फिल्ड; कडेकोट बंदोबस्त
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलीस आयुक्त स्वतः फिल्डवर आले असून, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
04 May, 22 07:53 AM
अजानवेळी मनसैनिकांनी लावली हनुमान चालीसा
राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कांदिवली, जळगाव, नवी मुंबईत अजानवेळी हनुमान चालीसा लावल्याचे सांगितले जात आहे.
04 May, 22 07:46 AM
रात्रभर पोलिसांची कारवाई सुरूच; मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. मंगळवार रात्रभर पोलिसांची कारवाई सुरू होती.