उद्याचा दिवस औरंगाबाद आणि राज्यासाठी हायव्होल्टेज असताना पूर्वसंध्येला मोठमोठ्या नेत्यांच्या शहरात रांगा लागू लागल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आलेले आहेत, त्याचबरोबर एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसीदेखील औरंगाबादमध्ये पोहोचले आहेत. यामुळे औरंगाबादमधील आजची सायंकाळ वाढलेल्या तापमानात रंग भरू लागली आहे.
राज ठाकरे हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या मुलाच्या रिसेप्शनला पोहोचले आहेत. तर दुसरीकडे ओवेसी इम्तिया जलील यांच्या घरी इफ्तार पार्टीला पोहोचले आहेत. ओवेसी यांची उद्या नांदेडमध्ये सभा आहे, तर राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आहे. यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. जलील यांनी राज ठाकरेंनाही इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले होते. परंतू राज यांनी ते स्वीकारले नाही.
राज यांनी मशीदींवरील भोंग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका करताना राज यांनी तीन मेचा अल्टिमेटम दिला आहे. तोवर जर भोंगे उतरले नाहीत तर मनसे मशीदींसमोर हनुमान चालिसा लावणार आहे.
मनसेचे राज ठाकरे हे पुण्याहून औरंगाबाद येथे निघाले होते. यावेळी त्यांनी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर कवी कलश यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. समाधीस्थळी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर ते औरंगाबादमध्ये पोहोचले. तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.