महाड (रायगड) - काही महिन्यांपूर्वी एकमेकांना शिव्याशाप देत असलेले शिवसेना आणि भाजपा हे योग्य वेळ येताच युती करणार हे आधीच ठरलेले होते. भाजपा आणि शिवसेना हे दोघेही सत्तेसाठी पैशांसाठी लाचार पक्ष आहेत. ते जनतेचा विचार करत नाहीत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील, अशी घणाघाती टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज महाड येथील सभेत केला.
पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी कोकणातील महाड येथे जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यात झालेल्या युतीवरही घणाघात केला.''भाजपा आणि शिवसेना हे दोघेही सत्तेसाठी पैशांसाठी लाचार पक्ष आहेत. ते जनतेचा विचार करत नाहीत.''असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी नाणार प्रकल्पाचाही उल्लेख राज ठाकरे यांनी केला. ''नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर काहीजण माझ्याकडे आले होते. त्यांनी पेढे दिले. मात्र नाणारबाबत बेसावध राहू नका. यांचा भरवसा नाही. निवडणुका झाल्यानंतर हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
कोकणामध्ये पर्यटनाची क्षमता मोठी आहे. केरळसारखे राज्य केवळ पर्यटनावर आपली अर्थव्यवस्था चालवत आहे. केरळपेक्षा कोकणात अधिक चांगले निसर्गसौंदर्य आहे. कोकणाची पर्यटनाची क्षमता इतकी अफाट आहे की इथले तीन जिल्हे आख्ख्या महाराष्ट्राची काळजी घेऊ शकतं. पण येथील अनेक आमदार, खासदार झाले. दिल्लीला गेले. पण त्यांनी विकासाच्या दृष्टीने काही केले नाही. केवळ चांगले रस्ते झाले म्हणजे विकास नव्हे, असाही टोला राज ठाकरे यांनी लगावला.