मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आपण हा बॅकलॉग नक्की भरून काढू असा शब्द दिला होता. त्याप्रमाणेच राज ठाकरे एका पाठोपाठ एक व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करून आपल्या अंदाजाने टीका करत आहेत.
शनिवारी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर टीका केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मदतीला घेऊन महाराष्ट्राच्या जनतेची कान उघाडणी केली आहे. त्यांनी यामध्ये बिन चेहऱ्याचे जातीपातीचे नेते दाखवले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या जातीच्या लोकांशी संवाद साधत असल्याचं म्हटलं आहे.
'अरे, तुम्हासर्वांना बरोबर घेऊन मी मुघलांशी लढलो! आणि आज तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढताय!का? तर त्या जातीयवादी स्वार्थी नेत्यांसाठी! या रे माझ्या लेकरांनो त्या चिखलातून बाहेर या! असं या व्यंगचित्राच नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्र रेखाटलं होतं.२०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पण प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जळजळीत टीका केली. व्यंगचित्रामधून शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या धमक्यांचा समाचार घेतला आहे.
युतीमध्ये बेबनाव आल्याने शिवसेनेकडून युती तोडून सत्ता सोडण्याच्या धमक्या सातत्याने देण्यात येत आहेत. त्यावर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलं. " महाराष्ट्र सरकार (मधील एक) सादर करत आहे. (किती अंकी महित नाही. "परत सांगतो सोडून जाईन!" अशा आशयाचे शीर्षक राज यांनी या व्यंगचित्राला दिलं.