ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - यशाच्या मार्गावरुन भरकटलेल्या मनसेच्या इंजिनाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच इंजिनाची दिशा बदलणार असल्याची माहिती आहे. मनसेचे निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनचे तोंड सध्या उजव्या दिशेला आहे. लवकरच हे इंजिन तुम्हाला उजवीकडून डाव्या दिशेला धावताना दिसेल.
येत्या ८ नोव्हेंबरला पुण्यात मनसेचा मेळावा होत आहे. त्यामध्ये तुम्हाला इंजिनची दिशा बदलेली दिसेल. प्रबोधनकारांचा वारसा असलेले राज ठाकरे जाहीरपणे ज्योतिषशास्त्राचे समर्थन करत नाहीत पण सध्या पक्ष अडचणीत असल्यामुळे कदाचित त्यांनी वास्तूशास्त्र तज्ञांचा सल्ला मानला असावा.
मनसेच्या स्थापनेच्यावेळी इंजिनाची दिशा उजवीकडून डावीकडेच होती पण नंतर ही दिशा बदलून डावीकडून उजवीकडे करण्यात आली. २००९ ते २०१२ पर्यंत मनसेचे इंजिन जोरदार वेगाने पळत होते. त्यावेळी विधानसभा आणि महापालिका निवडणूकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले होते. मात्र मागच्या दोनवर्षात लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मनसेचे इंजिन थेट यार्डातच जाऊन पोहोचले. त्यामुळे कदाचित हा नवीन बदल पक्षाला फलदायी ठरेल अशी साहेब आणि मनसैनिकांची भावना असावी.