मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या सभेत अयोध्येला न जाण्याचे कारण सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले होते की, आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा काहींचा प्रयत्न होता. मनसैनिकांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जाईल, अशी भीतीही व्यक्त केली. अशा परिस्थितीत मनसैनिकांना कोणत्याही अडचणीत न टाकण्याचा निर्णय घेत अयोध्या दौरा रद्द केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले होते की, भाजपनेच राज ठाकरेंविरोधात ट्रॅप लावला आहे. त्यावर पलटवार करत सचिन सावंत अजून इतके मोठे नेते झालेले नाहीत की, ते भाजपवर प्रश्न उपस्थित करू शकतील, असे भाजपने म्हटले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर अयोध्येच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान, पक्षाच्या सांगण्यावरूनच मी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत आहे, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील बृजभूषण सिंह यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपची चांगलीच कोंडी झाली असून राज ठाकरेंविरोधात ट्रॅप भाजपचाच असल्याची चर्चा सुरु आहे आणि बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भाजपची खिल्ली उडवली जात आहे.
काय म्हणाले बृजभूषण सिंह?भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात हे वक्तव्य केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाचे काम म्हणून राज ठाकरेंना विरोध करत असल्याची कबुली दिली. ते म्हणाले की, मी 6 वेळा खासदार आहे. एकदा माझी पत्नीही खासदार होती. अशा प्रकारे मी सात वेळा माझ्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत आहे. आम्हाला कोणी का नाकारेल? , असे बृजभूषण सिंह यांनी सांगितले. तसेच, तुम्ही पक्षाच्या सांगण्यावरून राज ठाकरेंना विरोध करत आहात? असा सवाल करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, मी पक्षाचे काम करतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते तोंडघशी पडले आहेत.
('राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान)
काय म्हणाले होते राज ठाकरे?रविवारी राज ठाकरे यांनी पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्या दौरा रद्द का केला, याबद्दल सांगितले. ते म्हणाले, मी जबरदस्तीने अयोध्येला गेलो असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व हिंदू कार्यकर्ते माझ्यासोबत आले असते. तिथे मला काही झाले तर आमचे मनसैनिक सु्द्धा गप्प बसले नसते. अशा स्थितीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठविले असते. पण, मला ते नको होते, आमच्या पोरांना हकनाक तुरुंगात पाठवणार नाही, असे बाळा नांदगावकर आणि इतर नेत्यांना सांगितले. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असते. ऐन निवडणुकीच्या वेळी असे झाले असते, तेव्हा येथे प्रचार करायला कोणीच नसते. हा सर्व ट्रॅप होता. कोणताही एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो. हे शक्य आहे का? या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत, असे राज ठाकरे म्हणाले होते.